रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे - पडवेवाडी येथे नोटरी केलेल्या जागेच्या वाटेत चिऱ्यांची भिंत उभारुन दडपशाही करुन रस्ता बंद केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी प्राैढाविराेधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडला.
पाेलिसांनी सुधीर विठ्ठल बालम (५३, रा. हनुमाननगर, पडवेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात अब्दुल्ला अ. रहमान वस्ता (७४, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सुधीर बालम यांना रस्ता वापराकरिता संमत्ती दिलेल्या व अब्दुल्ला वस्ता यांच्या नोटरी केलेल्या जागेच्या वाटेत बालम यांनी चिऱ्याची भिंत उभारली आहे. दडपशाही करुन हा रस्ता बंद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार वीर करत आहेत.