राजापूर : निसर्गरम्य काजिर्डा गावात भरभरून निसर्गसौंदर्य प्राप्त झाले असून, ते नष्ट करण्याचा विडाच शासनाने उचलला आहे. त्यामुळेच जामदा प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. येथील जनतेचा असलेला विरोध लक्षात घेता हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तत्परतेने हाती घ्यावे, अशी मागणी काजिर्डा गावात पार पडलेल्या मेळाव्यात उपस्थितांनी केली.धर्मराज शेतकरी संघटनेच्यावतीने काजिर्डा गावात शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजन राजे, प्रा. गोपाळ दुखंडे, पक्षाचे उपाध्यक्ष राजन सावंत, अण्णा हजारे संयोजन समिती अधिकार कार्यकर्ता परिषद विजय कुर्ले, धर्मराजचे सचिव संतोष काजारे, नितीन आर्डे, सरपंच अंजली आमकर, प्रकाश आमकर, अशोक आर्डे, रामजी पाटील, सचिन पाटेकर, प्रमोद आर्डे, आत्माराम पांचाळ, ग्रामविकास समिती अध्यक्ष वैशाली पांचाळ, मीनाक्षी पांचाळ, साबाजी सावंत, लक्ष्मण जोशी, रामचंद्र आर्डे, किशोर आर्डे, वासुदेव सुतार उपस्थित होते.मागील दशकभरापासून समस्त काजिर्डावासीयांवर जामदा प्रकल्पाची टांगती तलवार आहे. एवढ्या कालावधीत हा प्रकल्प काही पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे जनतेला न्यायही मिळालेला नाही. स्थानिक जनतेचा जामदा प्रकल्पाला प्रखर विरोध असून, शासन त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे रेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. पण धर्मराज शेतकरी संघटना स्थानिक जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिली. शासनानेच हा प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली. शिवाय गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या काजिर्डा - पडसाळी घाट रस्त्याचे काम सुरु करावे, अशीही आग्रहाची मागणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते यापूर्वी २६ जानेवारीला नियोजित घाटी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा रस्ता मार्गी लागल्यास जामदा परिसरातून कोल्हापूरकडे जाणारा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. जामदा प्रकल्प रद्द करून रस्त्यासाठी जोरदार प्रयत्न करु, अशी ग्वाही उपस्थितांनी यावेळी दिली. त्यासाठी मोठे जनांदोलन उभारण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. (प्रतिनिधी)
जामदा प्रकल्प रद्द करा
By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST