दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर इतर आजाराच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालये असावित किंवा प्रत्येक तालुका स्तरावर सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दाखल करून घ्यावे़, तसेच तेथे उपचाराची व्यवस्था करण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रशांत परांजपे यांनी केली आहे़ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बोलून निर्णय कळवतो, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले़
कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडले जाते. रुग्णालयामधून घरी सोडल्यावर सात दिवसांचा क्वाॅरंटिन काळ असतो. नंतर तो रुग्ण पूर्णतः निगेटिव्ह समजला जातो; मात्र नियमानुसार रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यापासून एक महिना कोणत्याही खासगी रुग्णालयात (त्या रुग्णाचा क्वाॅरंटिन काळ संपला तरीही) उपचाराकरिता दाखल करता येत नाही, असे परांजपे यांनी सांगितले़
कोरोनामुक्त झालेल्या किंवा क्वाॅरंटिन काळ संपलेल्या एखाद्या रुग्णाला अचानक काही इतर आजार बळावल्यास कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करता येत नाही. प्रसंगी व्यवस्था असूनही कायद्याने हात बांधले असल्याने एखाद्या रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत आणि प्रसंगी प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे काेराेनामुक्त रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालय उभारावे, अशी मागणी परांजपे यांनी केली़