दरवाढीचा फटका
रत्नागिरी : इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या यांत्रिक अवजारांचे भाडेदर वाढले आहे. मजुरांचा अभाव लाभत असल्याने यांत्रिक अवजारांचा वापर करण्यात येत आहे. पाॅवरटिलर, ग्रासकटर याचा वापर करण्यात येतो. ही अवजारे इंधनावर चालत असल्याने इंधन दरवाढीमुळे भाडे वाढले आहे.
लाल, काळ्या भाताची लागवड
खेड : हळदी लागवडीबराेबर काळा तांदूळ व लाल सडीचा तांदूळ भातबियाणेही लागवड केली जाणार आहे. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, खेड व मंडणगड पंचायत समिती सेस फंड, जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे यांच्या माध्यमातून तरतूद केली आहे.
चालक वंचित
मंडणगड : तालुक्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत चालक गेले चार महिने वेतनापासून वंचित आहे. वास्तविक चालकांवर कामाचा ताण वाढला असताना ठेकेदाराकडून अल्प वेतन देण्यात येत असून तेही नियमित मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नीलेश तांबे यांची निवड
खेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच या साहित्यिक, धार्मिक, कलाक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या कोकण विभागीय समितीची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या कोषाध्यक्षपदी स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक नीलेश तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
आयसोलेशन केंद्र
राजापूर: राजापूर नगरपरिषदेतर्फे शहरातील कोरोना रुग्णांसाठी वरची पेठ शाळा क्रमांक २ मध्ये लवकरच २५ बेडचे आयसोलेशन केंद्र सुरू केले जाणार आहे. शहरात कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना याठिकाणी ठेवले जाणार आहे.
शिक्षक समितीचे निवेदन
रत्नागिरी : कोरोनामुळे गेले वर्षभर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय सोडून आपल्या गावी जाता आले नाही. दि. १ ते १४ जूनपर्यंत शिक्षकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक समन्वय समितीतर्फे शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गावात शांतता
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावात ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, ग्रामस्थ, व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत पाच दिवसांची कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गावात सध्या शांतता आहे. दूध विक्री सकाळी ८ ते ९ तर औषधांची दुकाने सकाळी १० ते १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवली जात आहेत.
मशागतीची कामे पूर्णत्वाकडे
रत्नागिरी : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून बळिराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काही गावातून पावसाचा शिडकावा सुरू आहे. त्या गावात शेतकऱ्यांनी धूळ वाफेच्या पेरण्या केल्या आहेत. खते, बियाणांची जुळणी करण्यात आली असून मृगनक्षत्रावर पेरण्यांची कामे सुरू होणार आहेत.