देवरुख : पाेहण्यासाठी सप्तलिंगी नदीपात्रात उतरलेला प्राैढ वाहत जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी घडली हाेती. विनायक रामचंद्र गीते (३६, रा. चटकवाडी, तळेकांटे) असे त्यांचे नाव असून, त्यांचा मृतदेह साेमवारी सायंकाळी मुचरी पुलाजवळ आढळला.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक रामचंद्र गीते हे रविवारी मुलगी प्राची (५) व भाचा स्वराज कारकर (८) यांना घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सप्तलिंगी नदीचे पाणी दाखविण्यासाठी घेऊन गेले हाेते. त्यानंतर, ते परटाचे कोंड या ठिकाणी पोहण्यासाठी उतरले हाेते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.
ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी उशिरा शोध थांबवून पुन्हा सोमवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजता मुचरी पुलाजवळ ग्रामस्थांना एक मृतदेह दिसला. हा मृतदेह विनायक गीते यांचा असल्याची खात्री पटल्यावर देवरुख पोलिसांना माहिती देण्यात आली. देवरुख पाेलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर, मृतदेह वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विच्छेदन करून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जावेद तडवी करीत आहेत.
--------------------------
मुलींचे पितृछत्र हरपले
विनायक गीते यांना सात वर्षांची रसिका आणि पाच वर्षांची प्राची या दाेन मुली आहेत. त्यांच्या जाण्याने या दोन लहानग्या मुलींचे पितृछत्र हरपले आहे. विनायकच्या पश्चात पत्नी, आई आणि दोन मुली असा परिवार आहे. विनायक हा एका ढाब्यावर गेली काही वर्षे आचारी म्हणून काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या तो घरीच हाेता.