रत्नागिरी : राज्यात ‘ब्लड आॅन कॉल’ अर्थात ‘जीवन अमृत सेवा’ योजना ७ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आली असून रत्नागिरीतून १०४ या टोल फ्री नंबरवरून संपर्क साधलेल्या २४७ रुग्णांना गेल्या साडेपाच महिन्यात ते उपचार घेत असलेल्या ठिकाणी रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पराग पाथरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अपघात झाला की रक्ताची नितांत गरज भासते, एवढंच नव्हे तर ते रक्त मिळवायचे असेल तर संबंधित रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्याचा दूरध्वनी क्रमांक शोधण्यापासून तयारी सुरू होते. पण आता त्याची गरज नाही. रक्तपुरवठादार संस्था किंवा दात्यांचे दहा आकडी नंबर लक्षात ठेवण्यापेक्षा केवळ तीन अंक लक्षात ठेवा आणि रक्त मिळवा. गरज आहे ती फक्त एका कॉलची! कॉल करा, रक्त तुमच्या शरिरात सळसळण्यासाठी पुढ्यात उभं असेल. सळसळत पुढ्यात उभं राहणारं रक्त पाहून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. कारण शासनाने १०४ हा टोल फ्री नंबर यासाठी कार्यान्वित केला आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना अनेकदा रक्त आणण्यात बराच वेळ जात होता. अनेकदा रक्त बाहेरच्या जिल्ह्यातूनही आणावे लागत होते. जीवन अमृत सेवा ही योजना प्रथम सिंधुदुर्ग व पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली. त्याचा प्रतिसाद पाहून नंतर ७ जानेवारी २०१४ पासून संपूर्ण राज्यात ही योजना कार्यान्वित झाली आहे. रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात रक्त विघटन केंद्र सुरू झाले असून जानेवारीपासून १०४ टोल फ्री नंबरवर रक्ताची मागणी करणारे अनेक फोन घणघणत आहेत. यासाठीचे समन्वय साधणारे १०४ हेल्थ अॅडवाइज कॉल सेंटर पुण्यात असून तेथे राज्यभरातून रक्त मागणीचे फोन गेल्यानंतर काही मिनिटात त्याचा संदेश नजिकच्या रक्तविघटन केंद्राला दिला जातो. त्यानंतर तासाभरात विविध चाचण्या करून रक्त रुग्ण असलेल्या ठिकाणी पोहोच करण्यात आले आहे. रत्नागिरीत रक्त विघटन केंद्रातून अशा रक्ताचा पुरवठा करण्याचे काम झाडगाव, रत्नागिरीतील आधार सेवा ट्रस्टला देण्यात आले आहे. या संस्थेच्या प्रतिनिधीने दुचाकीसह जिल्हा रुग्णालयात थांबायचे, अशी व्यवस्था आहे. रक्त मागणीचे दिवसातून ६ ते ७ कॉल असतात. पुण्यावरून कॉल दिला गेल्यानंतर संस्थेचा हा प्रतिनिधी तत्काळ त्या रुग्णालयात वा रुग्ण असलेल्या पत्त्यावर पोहोचतो. तेथे रुग्णाच्या रक्ताचा नमुना व रक्तमागणी अर्ज घेऊन रक्त विघटन केंद्रात येतो. या केंद्रात रक्ताचा गट तपासून नंतर क्रॉस मॅचिंग केले जाते. त्या रक्तगटामध्ये दुसरा उपगट आहे काय याची पडताळणी होते. या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रक्त पोहोचविणाऱ्या प्रतिनिधीकडे ‘कोल्ड बॉक्स’ मधून रक्त पिशवी व त्याबाबतचा अहवाल दिला जातो व त्याच्याकडून संबंधित रुग्णापर्यंत हे रक्त तत्काळ पोहोचविले जाते. जानेवारीपासून १७ जूनपर्यंत प्लेटलेट, लाल रक्तपेशी, प्लाझमा याच्या २४७ पिशव्या रुग्णांना पोहोच करण्यात आल्या. याबाबत अद्यापही जिल्ह्यात म्हणावी तशी लोकजागृती झालेली नाही. त्यामुळे अजूनही रुग्णांना याबाबत माहिती नाही. मात्र याचा उपयोग रक्ताअभावी मृत्यूशी दोन हात करणाऱ्या लोकांना होउ शकतो, तडफडणाऱ्या जीवांना याचा लाभ होऊ शकतो. एवढेच नव्हे तर ज्यांना रक्तपुरवठा तातडीने गरजेचा आहे, त्या जगण्याची प्रबळ इच्ठाशक्ती असलेल्या लोकांनाही जगण्याची उमेद मिळू शकते.(प्रतिनिधी)