रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले गेलेले नुकसानीचे आकडे चुकीचे आहेत. समोर दिसत असलेले नुकसान भरपूर असताना हे आकडे इतके कमी कसे? इतके कमी नुकसान दाखवले गेले तर केंद्राकडून भरपाई मिळणार कशी, असे प्रश्न भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. कोकणातील पाचही जिल्ह्यांत भाजपकडून जनता पंचनामा अशी समांतर यंत्रणा राबवली जाणार असल्याचेही त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांसमोर नुकसानाचे जे आकडे मांडले गेले, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. नुकसान अधिक झालेले असतानाही आकडे कमी दाखवले गेले आहेत. एकीकडे ११०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे या अहवालात नमूद आहे आणि ३४०० पंचनामे झाल्याचे सांगितले जात आहे. घरांबाबतही तीच स्थिती आहे. हे आकडे आले कोठून, असा प्रश्न त्यांनी केला. सरकार आणि जनतेची यातून फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला, तेव्हा ५००० घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली होती, पण मुख्यमंत्र्यांसमोर हाच आकडा कमी सांगितला गेला आहे. जर नुकसान कमी दाखवले गेले तर केंद्राकडून अधिक भरपाईची मागणी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला.
पंचनामा झाल्यानंतर भरपाईचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, पण पंचनामे होणार कधी आणि भरपाई देणार कधी हा प्रश्नच आहे. त्यावर भाजपने पर्याय सुचवला होता. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यास नुकसानाचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो, असे सुचवण्यात आले होते. मात्र, भाजपची सूचना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता यावर पर्याय म्हणून भाजपकडून जनता पंचनामा अभियान राबवले जाणार आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांनी आपल्या नुकसानाचा व्हिडिओ तयार करून पाठवावा. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. एक-दोन दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हे सर्व सरकारसमोर ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.
.........................
भास्कररावांचे ऐकतात का?
केवळ मोडलेल्याच नाही तर पिळवटलेल्या झाडांनाही नुकसानभरपाई मिळावी, असा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला आहे. त्यांचा मुद्दा रास्तच आहे, पण या सरकारमध्ये भास्कररावांचे ऐकले जाते का? जर ऐकले जात असेल तर ती माझे मुद्देही त्यांच्याकडे नेतो, असा टोला माधव भंडारी यांनी मांडला.
...................
निदान पालकमंत्री दिसले
मुख्यमंत्री आले म्हणून रत्नागिरीकरांना त्यांचे पालकमंत्री अनिल परब हे दिसले तरी. नाही तर ते रत्नागिरीत कधी दिसतच नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.