रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या काळात उदय सामंत यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोठी संधी दिली. असे असतानाही त्यांना अजून काय कमी पडले? असा सवाल करीत आधी उमेदवारीसाठी एबी फॉर्म घेऊन दुसऱ्याच दिवशी पक्षत्याग करणाऱ्या सामंत यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी केली आहे. हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. सत्ता दिलेली माणसे पक्षाशी गद्दारी करू शकतात, तर ती जनतेशी काय इमान राखणार? अशा दलबदलूंना मतदार या निवडणुकीत धडा शिकवतील, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, दलबदलू नेत्याने स्वार्थासाठी पक्ष बदलल्याने पक्षाचे नुकसान होेणार नाही. सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आहेत व ते पक्षाचे अधिकृत उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. सिंचन अहवालामुळेच युती तुटली काय, असे विचारता तटकरे यांनी त्याचा साफ शब्दत इन्कार केला. (प्रतिनिधी)
उदय सामंतांकडून सर्वात मोठा विश्वासघात : तटकरे
By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST