फोटो- लांजा तालुक्यातील भडे येथे पिकअप शेडचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सुधीर तेंडुलकर उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा :
शासनाच्या निधीचे योग्य ते नियोजन करून योग्य तिथे विनियोग केला, तर गावामध्ये आदर्शवत विकासकामे उभी राहू शकतात आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील भडे ग्रामपंचायत आहे. सरपंच सुधीर तेंडुलकर यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून लाखो रुपयांच्या होत असलेल्या जनतेच्या सोयीच्या विकासकामामुळे भविष्यात भडे ग्रामपंचायत लांजा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत ठरेल, असा विश्वास शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे यांनी भडे येथे नवीन पिकअप शेडच्या उदघाटन प्रसंगी केला.
तालुक्यातील भडे ग्रामपंचायतीतर्फे शासनाच्या १५ टक्के निधी तसेच पर्यावरण निधीतून विविध विकासकामे करण्यात येत असून, स्थानिक जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दोन पिकअप शेड बांधण्यात आले आहेत. त्यांचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी भडे गावचे युवा सरपंच सुधीर तेंडुलकर, युवासेना विभागप्रमुख रूपेश सुर्वे, तंटामुक्त अध्यक्ष वासुदेव आगरे, भडे शाखाप्रमुख संजीवकुमार राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय खर्डे, राजेंद्र मयेकर तसेच भडे पेवखल तसेच वरपाट वाडी येथील ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या विकासकामाबाबत समाधान व्यक्त केले.