अडरे : ‘अक्षर’ हे माणसाच्या शरीरातील अवयवासारखे असते. अक्षरामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव समजतो. आपण अक्षरावर जीव लावत नाही, तोपर्यंत अक्षर वळणदार, उठावदार दिसणार नाही. जेव्हा रेषेतील अंतर कळतं, तेव्हा माणसातील अंतर कळतं, असं मत सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केलं. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन रावसाहेब खातू व्याख्यानमालेत ‘ऐसी अक्षरे’ या विषयावर डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा विद्याताई घाणेकर होत्या. संस्थेचे विद्यमान चेअरमन सुचय रेडीज, व्हाईस चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. श्याम जोशी, श्रीराम रेडीज, अविनाश जोशी, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम दलवाई, महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य पी. बी. कांबळे, प्रा. विनायक होमकळस, प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. यावेळी पालव म्हणाले की, संस्थेच्या जडणघडणीत रावसाहेबांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानामुळे महाविद्यालयाने ४९ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्याप्रमाणे आपणसुद्धा माणसे जोडण्याचे काम केले पाहिजे. अक्षराचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. कलेकडे बघत असताना कला म्हणून बघा, छंद म्हणून नको. कलेला धर्म, जात नसते, असे विचार त्यांनी मांडले. प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक बांद्रे यांनी केले. संस्थेचे सेक्रेटरी माधव चितळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
अक्षरातून व्यक्तिमत्त्व समजते!
By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST