रत्नागिरी : बहुजन समाज आज मागासलेला आहे आणि याला जबाबदार महात्मा गांधी आहेत, असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. भारत मुक्ती मोर्चा रत्नागिरी जिल्हा अधिवेशनप्रसंगी मराठा मंदिर सभागृहात ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, रत्नागिरी जिल्हा कोकण बँक उपाध्यक्ष बशीर मुर्तुझा उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, भारतामध्ये इंग्रज स्वातंत्र्याच्या १५० वर्षे आधी आले होते. पण त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राह्मणांनी बहुजन समाजाला आपले गुलाम केले होते व नंतर इंग्रजांनी ब्राह्मणांना गुलाम केले. परिणामी बहुजन समाज गुलामांचा गुलाम बनला. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण बहुजन समाज आजही ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला नाही म्हणून तो आजही मागासलेला आहे, असे ते म्हणाले.मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस सरकारने नेहमीच जाती - पातीचे राजकारण केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी मराठा, मुस्लिम, लिंगायत व धनगर अशा आरक्षणाच्या घोषणा निवडणुकीपूर्वी केल्या व निवडणुकीनंतर हीच आरक्षणे न्यायालयामध्ये ठेवली असा आरोपही त्यांनी केला. देशात सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण सुरु करण्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी छेडला. ओबीसी जातीनिहाय मोजणी झाली तर ओबीसी संख्या किती आहे हे जनतेला माहिती होईल व सत्ता हाती ठेवण्यासाठी अडचण निर्माण होईल, असेही ते यावेळी म्हणाले. (वार्ताहर)भारत मुक्ती मोर्चातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या जिल्हा अधिवेशनाला जिल्हाभरातून बांधव उपस्थित होते. त्यामुळे या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अधिवेशनामध्ये बहुजन समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतांसाठी बहुजन समाजाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली.
गांधींमुळेच बहुजन मागासलेले
By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST