सुभाष कदम - चिपळूण शहराचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे लहान मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहेत. शहरातील या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून आता शहरासाठी दोन स्वतंत्र बीटमार्शलची व्यवस्था केली आहे. दुचाकीवरुन शहरभर सतत बंदुकधारी पोलीस फिरत राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय शिंदे यांनी गुन्हेगारीवर टाच आणण्यासाठी व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपळूण शहराच्या दोन भागात बीटमार्शल तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून प्रायोगिक तत्वावर दोन मोटारसायकलधारक शस्त्रधारी हवालदार शहरात गस्त घालू लागले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी चिपळूण शहरातील वाहतुकीचा प्रश्न, वाढती गुन्हेगारी, होणारे लहान मोठे अपघात, महिला व तरुणींची होणारी छेडछाड, किरकोळ हाणामारी, लहान मोठे अपघात याचा विचार करुन सध्या शहराचे दोन भाग केले आहेत. या दोन्ही भागात २४ तास बीटमार्शल कार्यरत राहणार आहेत. सध्या शहरात विविध ठिकाणी बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर येथे वास्तव्यास असतात. त्यांच्याकडून चोऱ्या, घरफोड्यांसारखे प्रकार घडतात. भंगारवाल्यांकडेही अनेक चोरीचा मुद्देमाल विकला जातो. महाविद्यालय व शाळा परिसरात अनेक तरुण मुलींची छेडछाड करतात. धूमस्टाईल दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरतात. यावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहून ती नियंत्रित होईल. या नव्या प्रयोगामुळे दरोडे, चोऱ्या, गैरप्रकाराला आळा बसेल.गुन्हेगारी नियंत्रित करण्याचा प्रयत्न शहरात सध्या प्रायोगिक तत्वावर बीटमार्शल संकल्पना राबविली जात आहे. लवकरच ती कायमस्वरुपी आम्ही कार्यरत करणार आहोत. सध्या दोन शस्त्रधारी हवालदार दोन भागात काम करतील. त्यांच्याबरोबर एक एक कर्मचारी असेल. पोलीस ठाण्यात एखाद्या घटनेबाबत माहिती मिळाल्याबद्दल तत्काळ त्या बीटमार्शलला कळविले जाईल. त्यानुसार ते घटनास्थळी पोहचतील. बीटमार्शल सतत फिरत राहिल्याने, गुन्हेगारांवर अंकुश राहिल. गरज भासल्यास जादा बीटमार्शलही ठेवले जातील.
चिपळूणमध्ये बीट मार्शल
By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST