मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख - साखरपा मार्गावरील बावनदी पुलाच्या तुटलेल्या कठड्याला काठ्यांचा आधार देण्यात आला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी वाहन चालकांमधून करण्यात आली आहे.देवरुख - साखरपा मार्गावरुन नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे वाहनचालक याच मार्गाला पसंती देतात. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या गाड्या येत असतात. त्याचबरोबर साखरपा परिसरातील नागरिकही कामानिमित्ताने याच मार्गाने देवरुखात येत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते.परंतु, काही महिन्यांपूर्वी बावनदी पुलाचा कठडा तोडून एक ट्रक थेट नदीपात्रात कोसळला होता. सुदैवाने या अपघातातून ट्रकचालक बचावला होता. मात्र, ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. यानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने काठ्यांचा आधार दिला होता. अद्यापही या पुलाला हा काठ्यांचा आधार कायम आहे.या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे या पुलावर दुर्दैवाने अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ही दुर्घटना रोखायची असेल तर पुलाच्या कठड्याला असलेल्या काठ्यांच्या आधाराऐवजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्यस्थितीला पुलाच्या कठड्याला देण्यात आलेला काठ्यांचा आधार कमकुवत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ सिमेंटचा कठडा बाधंणे आवश्यक बनले आहे. यावर संबंधीत खात्याने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. (वार्ताहर)
बावनदी पुलाला काठ्यांचा आधार
By admin | Updated: October 6, 2015 00:17 IST