लांजा : येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या पतसंस्थेला सलग तिसऱ्या वर्षी बँको २०२० पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामुळे लांजा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे. अशा सहकारी पतसंस्थांना बँक कोल्हापूर व गॅलेक्सी ईनमा पुणे यांच्यातर्फे बँको पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२० या वर्षातील बँको पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, व्यवसायवाढीसाठी केलेल्या नवीन योजना इत्यादीबाबत संपूर्ण माहितीच्या आधारे तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी रुपये १५ते २० कोटीपर्यंत या विभागामध्ये राज्यस्तरीय बँको २०२० या पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या पतसंस्थेची निवड केली आहे. कर्नाटक म्हैसूर येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या पतसंस्थेला बँको पुरस्कार प्रदान करण्यात आला.