रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण काळात बॅंक ऑफ इंडिया भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी आहे, असे उद्गार बॅंंक ऑफ इंडिया, रत्नागिरीचे विभागीय प्रबंधक केशवकुमार यांनी काढले. कोरोना काळात बॅंक ऑफ इंडियाच्या चार ग्राहकांचे निधन झाले. त्यांच्या वारसांना विमाराशीचे धनादेश केशवकुमार यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला बॅंक ऑफ इंडियाचे उपविभागीय प्रबंधक किशाेरचंद कंदी तसेच मारूती मंदिर शाखेचे मुख्य प्रबंधक चंदनकुमार उपस्थित होते. हा कार्यक्रम स्टार युनियन, डाईची लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि बॅंक ऑफ इंडिया संयुक्त रूपाने राबवत असल्याचे केशवकुमार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सामान्य जनतेसाठी असलेल्या प्रधानमंत्री स्वास्थ्य बिमा योजना व जीवनज्योती बिमा योजना, स्टार युनियन डाईची कंपनीतर्फे बॅंकेच्या माध्यमातून राबविल्या जातात. जीवनज्योती बिमा योजनेंतर्गत दोन ग्राहकांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश व अन्य दोन ग्राहकांच्या वारसदारांना एसयुडी लाईफ पाॅलिसी अंतर्गत ७.५० लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
विमा पाॅलिसी घेण्याविषयी ग्राहक लवकर तयार होत नाहीत. परंतु, कठीण समयी आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम या विमा योजना करत असल्याचे केशवकुमार यांनी सांगितले. किशाेरचंद कंदी यांनी सर्वांना या बहुमाेल योजनांमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन केले.
बॅंक ऑफ इंडियाचा ११६ वा स्थापना दिन...
बॅंक ऑफ इंडियाचा ११६ वा स्थापना दिन ७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दि. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत स्थापना दिन सप्ताह आयोजित करण्यात आला असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कर्ज योजना सुरू करण्यात आल्या असून, ग्राहकांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. बॅंकांच्या शाखा व्यवस्थापकांच्या बैठकीत बुधवारी ही माहिती देण्यात आली.
फोटो मजकूर
कोरोना काळात बॅंक ऑफ इंडियाच्या चार ग्राहकांचे निधन झाले. त्यांच्या वारसांना विमाराशीचे धनादेश केशवकुमार यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आले. यावेळी बॅंक ऑफ इंडियाचे उपविभागीय प्रबंधक किशाेरचंद कंदी तसेच मारूती मंदिर शाखेचे मुख्य प्रबंधक चंदनकुमार उपस्थित होते.