सावर्डे : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत खरवते येथील कृषी प्रक्षेत्राशेजारी लोकसहभागातून बांधण्यात आलेला सिमेंट साखळी बंधारा जून महिन्यातच पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. ज्या उद्देशाने या बंधाऱ्याची निर्मिती झाली ते उद्दिष्ट सफल झाल्याचे आज पाहावयास मिळत असल्याची प्रतिक्रिया सह्याद्री परिवाराचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली कोकणात सध्या पावसाचा जोर वाढला असून, नदीच्या पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जून अखेरीस ५४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोकणात दरवर्षी सरासरी ५ हजार मिलिमीटर अधिक पाऊस पडतो. परंतु, डोंगरदऱ्यातून हे सर्व पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते. याचा परिणाम म्हणजे डिसेंबरपासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाणीटंचाईची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निकम यांनी शासकीय निधीची वाट न पाहता स्वनिधी उभारत अशा पध्दतीचे ३ सिमेंट बंधारे मे महिन्यात बांधले. त्यामुळे लाखो लीटर पाणी अडवले गेल्याने परिसरातील विहिरींमधील पाण्याचे स्रोत वाढण्यास मदत झाली आहे. सध्या या बंधाऱ्यात दहा लाख लीटर पाणीसाठा झाला असून, दहिवली, खरवते या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. फळबागा तसेच अन्य नगदी पिकांसाठीची जमीनही ओलिताखाली येईल, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली आहे. बंधाऱ्याच्या आजूबाजूला शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (वार्ताहर) उद्देश सफल : पिकासाठी वापर करा जागतिक जलदिनानिमित्त स्वनिधीतून कृषी प्रक्षेत्राशेजारील ओढ्यात उभारण्यात आलेल्या सिमेंट साखळी बंधाऱ्याचा उद्देश सफल झाला आहे. या बंधाऱ्यातून विहिरी व झऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. उपलब्ध पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाला करून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन शेखर निकम यांनी केले.
लोकसहभागातील बंधारे फुल्ल
By admin | Updated: July 2, 2016 23:41 IST