रत्नागिरी : गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. दि. ८ ते १० सप्टेंबर आणि १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
कचऱ्याचे ढीग
राजापूर : शहरात दररोज कचरा नेण्यासाठी घरोघरी घंटागाडी जाते. तरीही शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीगच ढीग उभे राहिलेले दिसतात. या कचऱ्याच्या ढिगामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नवजीवन हायस्कूल, कोंढेतड विसर्जन घाट येथे कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जात असल्याने श्वानांकडून हा कचरा इतस्त: पसरला जात आहे.
एस. टी. बस सुरु
सावर्डे : राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाच्या पाटण आगारातर्फे कोकणातील गणेशभक्तांसाठी २५ ऑगस्टपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. स्वारगेट, कोथरुड, वारजे, पाटण ते चिपळूण कासे अशी ही बससेवा सुरु झाली आहे. या गाडीचे आगाऊ आरक्षण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गरजू कुटुंबांना मदत
चिपळूण : २२ जुलै रोजी झालेली अतिवृष्टी व महापुराचा फटका चिपळूण शहर व परिसरातील गावांना बसला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील ५० पूरबाधित व्यक्तींना धामणवणे ग्रामपंचायतीच्यावतीने गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी सरपंच सुनील सावंत यांनी पुढाकार घेतला.
वित्तीय साक्षरता केंद्र
रत्नागिरी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता प्रकल्पांतर्गत रत्नागिरी येथे मनी वाईज साक्षरता केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्रिसील फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा आर्थिक साक्षरता उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे.