अळीचा प्रादुर्भाव
रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला असून, भात पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याबाबत पीक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाने कुरतडल्याने भाताच्या लोंंब्या पानाबाहेर पडण्याआधीच गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाजारपेठेत स्वच्छता
खेड : भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयातील एनसीसी व एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील तीनबत्ती नाका येथील मुकादम कॉम्प्लेक्ससह परिसर स्वच्छ केला. यासाठी प्रमोद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.
संतोष फुंदे यांचा सत्कार
दापोली : येथील शिक्षण विभागातील कर्मचारी संतोष फुंदे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. फुंदे यांची बदली झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती रत्नागिरीचे उपाध्यक्ष विनायक वाळंज यावेळी उपस्थित होते.
साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, उलटी, जुलाब यामुळे रुग्ण त्रस्त असून, शासकीय तसेच खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. आरोग्य विभागाकडून साथीचे रोग नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत असून, काळजी घेण्याबद्दल जनजागृती केली जात आहे.