रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथून एका अल्पवयीन मुलीचे रिक्षेतून अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.१०) दुपारच्या वेळेस घडला. याप्रकरणी एका महिलेविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नसरुद्दीन नायबअली (३२, रा. कोहिनूर बिल्डिंग मांडवी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी ही महिला रिक्षेतून मिरकरवाडा येथे आली आणि तिने तेथील एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून रिक्षात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला हटकले असता तिने नागरिकांची माफी मागण्यास सुरुवात केली. तेव्हा नागरिकांनी तिला पुन्हा मिरकरवाडा येथे फिरकू नकोस असे सांगत सोडून दिले. सोमवारी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत होता. याप्रकरणी आता शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.