गणपतिपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतिपुळे येथील श्री चंडिकादेवी मंदिर ट्रस्टतर्फे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील सह्याद्री शिक्षण संस्थेला २५ हजारांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी येथील शाळेत व कॉलेजमध्ये सुमारे २००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २६ जुलै रोजी ज्या विद्यार्थ्यांचे पुस्तके, कपडे व अन्य साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांना आर्थिक साहाय्य म्हणून गणपतिपुळे येथील श्री चंडिकादेवी मंदिरातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तसेच श्री चंडिकादेवी मंदिराचे विश्वस्त विजय भिडे यांच्याकडूनही या संस्थेला पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी श्री चंडिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोताड, विश्वस्त विजय भिडे, खजिनदार आशीर्वाद सुर्वे, विश्वस्त योगेश पालकर उपस्थित होते. उपस्थित सर्व विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेच्या भाग्यश्री मोघे, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.