दापोली : आपला साखरपुडा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण व्हावा, या हेतूने साताऱ्यातील नवजोडप्याने चक्क अरबी समुद्रात १00 फूट उंच अवकाशात एकमेकांच्या हातात अंगठ्या घालून साखरपुडा केला. सातारा जिल्ह्यातील मनाली वाळिंबे व रोहन कुलकर्णी या तरूणांनी हा क्षण केवळ आपल्याच नाही तर अनेकांच्या लक्षात राहील, अशा पद्धतीने साजरा केला. दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी रंगलेला हा अनोखा सोहळा शनिवारी दिवसभर चर्चेचा विषय झाला होता. दापोली तालुक्यातील पर्यटनाचे दिवसेंदिवस आकर्षण वाढू लागले आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्याची पर्यटकांना भुरळच पडली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पॅराग्लायडींग, वॉटर स्पोर्टस्, विविध खेळांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर समुद्रातील पॅरासेलींग बोटीवरील पॅराशूटने उंच उंच भरारी घेण्याची हौसही अनेकांना आवरता येत नाही. समुद्राच्या या आकर्षणामुळे साताऱ्यातील तरुण जोडप्याने चक्क समुद्रातील पॅरासेलींगवर अनोखा साखरपुडा केला. पुणे येथे महिंद्रा कंपनीत इंजिनिअर असलेल्या रोहन कुलकर्णी यांनी भावी पत्नी मीनल वाळिंबे हिच्याशी मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलींग करत साखरपुडा केला. मीनलचे वडील श्रीपाद वाळिंबे सातारा येथे दूरसंचार खात्यात आहेत. या साखरपुड्यासाठी वाळिंबे व कुलकर्णी कुुटुंबीय शुक्रवारी सायंकाळी मुरुड येथे दाखल झाले होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता वैदिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर समुद्रातील पॅरासिलींग बोटीवर जाऊन दोघांनी एकत्र पॅराशूटच्या सहाय्याने उंच उंच भरारी घेत एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालून साखरपुडा केला. (प्रतिनिधी) १00 फुटांवर साखरपुडा हा साखरपुडा १00 फूट उंचीवर झाला. बोटीला १00 फुटांची दोरी होती आणि ती पूर्णपणे हवेत सोडण्यात आली होती. त्यामुळे हा साखरपुडा त्या जोडप्याबरोबरच किनाऱ्यावर आलेले पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांसाठीही अविस्मरणीय असा ठरला. मुरुडचा समुद्रकिनारा आपल्याला खूपच भावला. त्यामुळे या बीचवर पॅरासेलींग बोटीवर साखरपुडा करण्याची इच्छा मनात आली. मुरुड किनाऱ्याच्या आकर्षणापोटीच या ठिकाणी साखरपुडा करण्याचे ठरवले. या अनोख्या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच अरबी समुद्रात साखरपुडा होऊ शकला. - मनाली वाळिंबे सुखी संसाराची सुरुवात चांगल्या उपक्रमाने सुरुवात व्हावी म्हणून या ठिकाणी साखरपुडा केला. पॅराशूटवर बसताना वेगळा अनुभव मिळाला. दोघांनी एकत्र उंच भरारी घेऊन साजरा केलेला साखरपुडा आयुष्यातील खूप आनंदचा क्षण होता. पॅरासेलींगची सुरुवातीला भीती वाटली. परंतु आम्ही दोघं एकत्र असल्याने ती भीती दूर झाली. दापोली तालुक्यातील मुरुड पर्यटनस्थळ चांगलेच नावारुपाला येऊ लागले आहे. या बीचचे आकर्षण थेट समुद्रातील साखरपुड्यापर्यंत गेले. यापुढे असे अनेक कार्यक्रम समुद्रात होतील. पर्यटकांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आहे. - मासुम ऐणरकर व्यावसायिक, माजी सरपंच, मुरुड
अरबी समुद्राच्या साक्षीने अवकाशात ‘रेशीमगाठी’
By admin | Updated: January 3, 2016 00:50 IST