दापाेली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक बांबू प्रजातींचे अगरबत्ती निर्मितीसाठी संशोधन सुरु करण्यात आले आहे. या संशोधनाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बांबूपासून ८ अगरबत्ती निर्मितीचे प्रकल्प स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
अगरबत्ती प्रक्रियेचे प्रकल्प कोकणामधील बांबू प्रधान क्षेत्रामधील शेतकरी उत्पादक कंपनीला देण्यात येणार आहेत. लाभार्थी निवडण्याचे निकष व अर्जाचा नमुना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या www.dbskkv.org या संकेतस्थळावर आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये गेले अनेक वर्षे स्थानिक बांबू प्रजातींवर अभ्यास सुरु आहे. वनशास्त्र महाविद्यालयामध्ये बांबू प्रक्रियेवर संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत प्रकल्प प्राप्त झाला असून, त्यामध्ये हस्तकला (भेटवस्तू), फर्निचर, बांधकाम व बांबूच्या कोंबाच्या प्रक्रियेवर संशोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.