रत्नागिरी : गणेशोत्सवात घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात येणार असल्याने गणपतीच्या मखराभोवती आरास केली जाते. ही आरास सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.
तात्पुरती, सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहे. यावर्षी कित्येक मंडळांनी कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून सिंगल फेज, थ्री फेजच्या जोडण्यांची मागणी ग्राहकांनी केल्यानंतरच महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत सवलतीच्या दरात वीज पुरवठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. या अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येते. वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशाप्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी वीज वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज जोडण्यांसाठी आयएसआय प्रमाणित विजेची उपकरणे वापरावीत तसेच एकाच प्लगमधून अनेक वायर टाकू नयेत. गणेशोत्सव कालावधीत अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. मात्र, तातडीची मदत भासल्यास २४ तास कार्यान्वित असल्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.