रत्नागिरी : जन आशीर्वाद यात्रेत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवणाऱ्या अजून २ जणांना शहर पोलिसांनी बुधवारी रात्री बीड येथून ताब्यात घेतले. दत्ता श्रीमंत जाधव व परशुराम मल्हारी गायकवाड (दोन्ही रा. बीड) असे ताब्यात घेतलेल्या दाेघांची नावे आहेत.
भाजपने सुरू केलेली जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीत आल्यानंतर शहरातील मारुती मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चाेरट्यांनी दागिने चाेरले हाेते. त्यानंतर हे चाेरटे थेट कणकवलीपर्यंत पाेहाेचले हाेते. तेथेही त्यांनी आणखी काहींच्या गळ्यातील दागिने चाेरले हाेते. कणकवली येथील काही नागरिकांच्या जागरूकतेने बाळू तुळशीराम जाधव (२८, मूळ रा. बीड) याला ताब्यात घेतले हाेते. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हाेते. रत्नागिरी पाेलिसांनी त्याला कणकवलीतूनच ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणखी दाेघांना बीड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करीत आहेत.