गुहागर : तालुक्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून रुग्ण उपचारासाठी बेड संख्या वाढवत आहे. वेळणेश्वर कॉलेज इमारत, ग्रामीण रुग्णालय, खासगी रेम्बो लॉजिंग इमारत आदी सद्य:स्थितीत ७५ बेड उपलब्ध आहेत. आणखी ७५ बेड वाढविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
गतवेळी वेळणेश्वर इंजिनीअरिंग कॉलेजच्या दोन इमारतींचा ताबा घेण्यात आला होता. यामध्ये जवळपास ८५ हून अधिक बेड क्षमता होती. या ठिकाणी ऑक्सिजन व्यवस्था नसल्याने रुग्णांना विलगीकरणात ठेवून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जात होते. या वेळी पुन्हा एकदा वेळणेश्वर येथील ३५ बेडची इमारत ताब्यात घेण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दुसरी ५० बेडची इमारत लवकरच सुरू केली जाणार आहे.
गुहागर ग्रामीण रुग्णालयात सध्या २० बेड उपलब्ध असून यामध्ये १० बेडसाठी ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था उपलब्ध आहे. अद्याप तालुक्यात गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध नसल्याने कामथे किंवा रत्नागिरी सरकारी रुग्णालयात न्यावे लागत आहे.
खासगी स्तरावरील शृंगारतळी येथे रेम्बो लॉजिंगच्या इमारतीमध्ये २५ बेड क्षमतेचे खासगी कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. यापूर्वी गतवेळी कोरोना प्रभाव कमी होत असताना हे खासगी कोविड सेंटर सुरू झाले होते. मात्र रुग्णांअभावी काही दिवसांतच बंद झाले होते.
सध्या शासकीय व खासगी स्तरावरून मिळून ७५ बेड उपलब्ध असले तरी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ही क्षमता दुप्पट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वेळणेश्वर येथील दुसरी ५० बेडची इमारत तसेच अंजनवेल येथील युसुफ मेहर अली रुग्णालय येथेही तालुका आरोग्य अधिकारी देवीदास चरके व गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी मागील आठवड्यात पाहणी केली. या वेळी येथे आणखी २५ बेड क्षमता वाढू शकते, असा अहवाल देण्यात आला असून आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयाचा ताबा घेतला जाणार आहे. असे झाल्यास पुढील काळात तालुक्यासाठी १५० हून अधिक बेड उपलब्ध होणार आहेत.
....................................
‘निरामय’ सुरू होणे कठीण
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार लता धोत्रे व आरोग्य अधिकारी यांनी सध्या एन्राॅन काळापासून बंद असलेली निरामय रुग्णालयाची पाहणी केली. सद्य:स्थितीत या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करायचे झाल्यास अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या इमारतीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल व यासाठी आणखी वेळ लागेल. गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व प्रशासनाची धावपळ लक्षात घेऊन सध्या तरी निरामय रुग्णालय कोविड केअर सेंटरच्या निमित्ताने पुन्हा सुरू होईल, अशी स्थिती नसल्याचे बोलले जात आहे.