पूरग्रस्तांना मदत
रत्नागिरी : शहरानजीक खेडशी-शीळ येथील प. पू. स्वामी बाळ सत्याधारी महाराज अध्यात्मिक सेवा केंद्रातर्फे चिपळुणातील १५० पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक वस्तूंचे किट, पाणी, कपडे आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य प्रताप सावंतदेसाई, डाॅ. दिलीप पाखरे, उद्योजक अरविंद माने आदी उपस्थित होते.
आरोग्य केंद्राला संगणक संच
चिपळूण : कोरोना काळात रूग्णांना तत्पर सेवा देणे सुलभ व्हावे, या उद्देशाने सॅंडविक एशिया प्रा. लि., लोटे कंपनीतर्फे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राला संगणक संच व अन्य उपकरणांचे सहाय्य करण्यात आले. कोरोना चाचण्या, लसीकरण शिबिरांच्या आयोजनात रूग्णांची नोंदणी विनाविलंब व सुलभतेने व्हावी, यासाठी संगणकाची आवश्यकता होती.
छायाचित्र स्पर्धा
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पावसानंतरचा निसर्ग’ असा विषय देण्यात आला आहे. मोबाईल अथवा डिजिटल कॅमेरावर फोटो काढून नाव, मोबाईल नंबरसह पाठवावा. दि. २५ ऑगस्टपर्यंत फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो एडिट करताना कोणत्याही प्रकारे त्यात दुसऱ्या इमेजचे मिक्सिंग करू नये.
औषध फवारणी
चिपळूण : राष्ट्र सेवा दल, मुंबईतर्फे चिपळुणातील पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी औषध फवारणी सुरू केली आहे. मुंबईतील मालाड मालवणीतील सेवादल संघटक निसार अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे.
नाैकांना पेट्रोल वितरणास मान्यता
रत्नागिरी : श्री भगवती मच्छीमार सहकारी संस्थेला शासनाने डिझेल पंपावरून पेट्रोलचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे मान्यता मिळवणारा हा देशातील एकमेव मच्छिमारांचा ग्राहक पंप आहे. त्यामुळे तटरक्षक दल, नेव्ही, कस्टम, कोस्टगार्ड, पोलीस व मत्स्य विभागाच्या नाैकांसह संस्थेच्या सभासदांना पेट्रोल, डिझेल उपलब्ध होणार आहे.
कोळंबी संवर्धन केंद्रांना मान्यता
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोळंबी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नव्या ४० कोळंबी संवर्धन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कोळंबी उत्पादनात शंभर टनांची भर पडण्याचा अंदाज मत्स्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये यंदा ६६ हजार ३७४ मेट्रिक टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली आहे.
फोटोग्राफीचे मार्गदर्शन
देवरूख : आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रंथपाल सुभाष मायंगडे यांनी फोटोग्राफीमधील करिअरच्या संधी, फोटोग्राफीची उपयुक्तता व महत्त्व याबाबत माहिती दिली. प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शिक्षणाबरोबर छंदाचा विकास करून व्यक्तिमत्व विकासाचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
गुणगाैरव सोहळा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे विद्यार्थी गुणगाैरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कै. चंद्रकांत उर्फ बावाशेठ चव्हाण स्मृतिगंध प्रतिष्ठानतर्फे दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गाैरवपत्र व पुष्प देऊन गाैरविण्यात आले.
ड्रोन लसीकरण
रत्नागिरी : कोकणातील दुर्गम व अतिदुर्गम भागात कोरोना लसीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर कोकणातील दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी या तालुक्यांचा समावेश आहे.