पाली : येथील मंगलमूर्ती फाउंडेशनतर्फे रविवार, १५ ऑगस्ट रोजी पाली आणि पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालीतील गणपत धोंडशेठ पाखरे (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्त्वावर लोकार्पण करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंगलमूर्ती फाउंडेशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता पालीतील श्री मंगल कार्यालय येथे श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थान, पाली पाथरटचे मुख्य मानकरी संतोष सावंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी परकार फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. अे. डी. परकार, रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम (भाऊ) वंजारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
याच कार्यक्रमात मंगलमूर्ती फाउंडेशनची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जयप्रकाश गणपत पाखरे यांनी केले आहे.