रत्नागिरी : राज्यातील मुदत संपलेल्या १०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन राज्य शासनाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु झाली आहे. मात्र, याबाबतचा कोणताही आदेश अद्याप बाजार समितीपर्यंत आला नसल्याची माहिती सचिव किरण महाजन यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० सप्टेंबर २००८ रोजी झाली होती. या निवडणुकीला ५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. नियमानुसार २०१३ साली बाजार समितीची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळ पडल्याने व सहकार कायद्यातील घटना दुरुस्तीचे कारण पुढे करुन २० एप्रिल २०१२ पासून सहकार क्षेत्रातील निवडणुका ठप्प झाल्या होत्या.शासनाने नुकताच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे सहकार क्षेत्राला राजकीय आखाड्याचे स्वरुप येणार आहे. जिल्ह्यातील ८१९ संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचाही त्यामध्ये समावेश आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही चलबिचल सुरु झाली असून, या समितीबाबत पणन संचालकांनी माहिती मागवली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे ही माहिती पणन संचालकांना पाठवली असून, लवकरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पुढील आदेश प्राप्त होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
कृ षी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु
By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST