दाभोळ : मोठ्या लोखंडी बोटींच्या सहाय्याने समुद्रातील माशांचे साठे सरसकट खरवडणाऱ्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या मुळावर उठलेल्या परप्रांतीय पर्ससीन नेट नौकांविरोधात मालवणमध्ये पेटलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हर्णैतील मच्छीमार तीव्र आंदोलन छेडणार आहेत. त्या आंदोलनाला दाभोळ बंदरातील मच्छीमार बांधवांचा पाठिंबा असेल. हर्णै व दाभोळमधील मच्छीमार बांधव एकत्र मिळून आंदोलन तीव्र करणार असल्याचे दाभोळ मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश शिरगावकर व सदस्य उदय जावकर यांनी सांगितले. रत्नागिरी - सिंधुदुर्गमधील मच्छीमार पूर्वापार लाकडी नौकेतून मासेमारी करत आहेत. सर्वांना रोजगार व्यवसाय मिळावा, हा यामागचा हेतू आहे. मात्र, सध्या परप्रांतीय मच्छीमार मोठ्या आकाराच्या लोखंडी नौका महाराष्ट्राच्या किनारी हद्दीत आणून मासेमारी करत आहेत. स्थानिक मच्छीमार नौकेच्या २० पट जादा मच्छी या नौका एकावेळी मारतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासळी दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागते. शासनाकडून याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत, तर अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या एनसीडीसीमध्ये लाकडी नौकांचे प्रस्ताव मंजूर होत नसताना लोखंडी नौकांचे प्रस्ताव कसे मंजूर होतात, असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत तीव्र आंदोलन छेडले जाणार असून, त्याची रुपरेषा हर्णै बंदरात ठरणार आहे. त्यालाही दाभोळ बंदरातील मच्छीमार बांधवांचा पाठिंबा मिळणार आहे. मालवणमध्ये चालू असलेल्या पर्ससीन नेटविरोधी संघर्षाला आमचा पाठिंबा असल्याचे प्रकाश शिरगावकर व सदस्य उदय जावकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
दाभोळ बंदरातही पेटणार आंदोलन
By admin | Updated: November 2, 2015 00:31 IST