राजापूर : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेदर आडिवरे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन वेत्ये येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. ही समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम 'शिक्षण विभाग पंचायत समिती राजापूर' व 'ग्रामपंचायत वाडापेठ' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात स्वच्छतेच्या प्रतिज्ञाने करण्यात आली.
गणेश विसर्जनाने किंवा समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांमुळे, प्लास्टिक किंवा अन्य स्वरूपामध्ये कचरा समुद्रकिनारी जमा झालेला होता. तो सर्व कचरा आडिवरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, आडिवरे परिसरातील महिला बचत गट, परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका, वाडापेठ ग्रामपंचायत सर्व सदस्य, परिसरातील सर्व शिक्षक वर्ग तसेच वाडापेठ ग्रामपंचायत तसेच शिक्षण विभागातील अधिकारीही या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. एकत्र आलेल्या स्वच्छता मोहिमेतील सर्व स्वयंसेवकांनी कोविडच्या नियमांचे पालन करून वेत्ये येथील समुद्रकिनारा स्वच्छ केला.
या मोहिमेमध्ये राजापूरच्या सहायक गटविकास अधिकारी तेजश्री आवळे, राजापूर महिला बालकल्याण विभागाच्या वायंगणकर, राजापूरचे सांख्यिकी विस्तार अधिकारी बलवंत हुलगुंडे, वाडापेठ ग्रामपंचायत सरपंच नंदिनी कदम, उपसरपंच सुनील रूमडे, ग्रामसेविका सारिका लांजेकर, आडिवरे कॉलेजचे प्राध्यापक व परिसरातील शिक्षक इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.