चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून १ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली. या प्रकरणी प्रवीण बाळकृष्ण चव्हाण (रा.मार्गताम्हाणे, चिपळूण) याला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कांतीलाल उमाप यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक सागर धोमकर यांनी हातभट्टी निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, उपअधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथक चिपळूण, खेड कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी मार्गताम्हाणे येथील चव्हाणवाडी येथे हातभट्टी निर्मितीसाठी आवश्यक असे रसायन साठवून ठेवलेल्या २०० लीटर मापाच्या जवळपास ६ बॅरल मिळून आले, तसेच गावठी दारूची वाहतूक करताना एक ओमनी कार मिळाली. त्या ठिकाणी गावठी दारू व रसायन असा मिळून १ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास १,२०० लीटर रसायन व १७५ लीटर दारू आढळली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक किरण पाटील, निखिल पाटील, महादेव आगळे, राजेंद्र भालेकर, जवान विशाल विचार, अतुल वसावे, सावळाराम वड यांनी केली.