वाटूळ : माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष सुधीर घागस यांच्या गाडीला मोठा अपघात झाला असून, सुदैवाने एअरबॅग असल्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांचे दोन सहकारी मात्र अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे वर्षश्राद्ध असल्याने सुधीर घागस, ज्ञानेश्वर गोसावी आपल्या इनोव्हा गाडीने मोते यांचे मूळ गाव असलेल्या नाशिक येथे जात असताना मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपळगावनजीक समोरून अचानक ट्रक आडवा आल्याने हा अपघात झाला.
हा अपघात एवढा भयानक होता की इनोव्हा गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने एअरबॅगमुळे सुधीर घागस व ज्ञानेश्वर गोसावी या अपघातातून बचावले. त्यांच्यासमवेत असलेले रवी हिंगमिरे व अवि यांना मात्र गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू आहेत.
मागील आठवड्यातच राजापूर तालुक्यातील दत्तवाडी येथे मोते यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी सुधीर घागस व त्यांची टीम रत्नागिरीत येऊन गेली होती. राज्याध्यक्ष सुधीर घागस व ज्ञानेश्वर गोसावी हे दोघेही सुखरूप असून, काळजी करू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले आहे.