०९आरटीएन०२.जेपीजी
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : रहदारीच्या मार्गावर व भरवस्तीत सुरू असणाऱ्या विनापरवाना डांबर प्लांटला अभय कुणाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा डांबर प्लांट बंद करण्याची मागणी माणी (ता. खेड) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने शत्रुघ्न उर्फ बंटी आंब्रे व अशोक आंब्रे यांनी केली आहे.
खेड तालुक्यातील माणी गावच्या हद्दीतील लवेल - माणी - सवेणी रस्त्यावर बौद्धवाडी लगत राहुल कन्स्ट्रक्शन कंपनीचा डांबर प्लांट सुरु आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरोग्य विभागाचा कोणताही परवाना नसताना गेल्या वीस वर्षांपासून हा प्लांट सुरु आहे. या प्लांटमुळे गावात ध्वनी व वायूप्रदूषण कमालीचे होत आहे. याच प्लांटच्या शेजारी गावातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहे. त्या पिण्याच्या पाण्यावरही याचा परिणाम होत आहे. प्लांटच्या समोरच गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र आहे. या नदीत गावातील पाळीव प्राणी पाण्यासाठी तर महिला कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्वच बाजूंनी हा त्रासदायक ठरणारा डांबर प्लांट बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी याआधीही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.
दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामस्थांनी पालकमंत्री अनिल परब व तत्कालीन पर्यावरण मंत्री आदिती तटकरे यांनाही निवेदन दिले आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी हा प्लांट बंद करणेबाबत ग्रामपंचायतीत संपूर्ण ग्रामसभेचा ठराव आला आहे. त्यानुसारच याच्याशी संबंधित असणाऱ्या मंत्री, अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याही पत्र व्यवहाराला कन्स्ट्रक्शनच्या मालकांनी केराची टोपली दाखविली. मंत्री व अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. ग्रामपंचायतीनेही संबंधित प्लांटला संमती वा नाहरकत दाखला दिला नसतानाही कुणाच्या आशीर्वादाने हा प्लांट बिनदिक्कतपणे सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
या प्लांटजवळच कंपनीने कामगारांना राहण्यासाठी विनापरवाना सतरा खोल्या बांधल्या असून, निर्मल ग्रामपंचायत व हागणदारीमुक्त ग्रामपंचायत असताना पाच खोल्यांमध्ये राहणारे महिला, पुरुष कामगार व त्यांचे कुटुंब उघड्यावर वा नदीत शौचास बसत आहेत, असेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. जेथे पाण्याची जॅकवेल आहे तेथेही उघड्यावर शौचास जाणाऱ्या इथल्या कामगारांची संख्या जास्त आहे. एकूणच सर्व मार्गानी माणी गावच्या पर्यावरणाचा समतोल या कंपनीने धोक्यात आणला आहे. त्यामुळे अनेक वर्षे या कंपनीच्या प्लांटच्या बंदच्या मागणीला कोणताही अधिकारी तत्परता दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
प्लांटची जागादेखील बिनशेती नसल्याचे समोर येत आहे. मागील काही वर्षांपूर्वी याच कंपनीने गावच्या आंब्रेवाडीशेजारी काळा दगड उत्खननासाठी केलेल्या भू सुरुंगात याच गावातील गावकऱ्यांच्या घरांना तडे गेल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ही कंपनी चर्चेत राहिली आहे.