शोभना कांबळे --रत्नागिरीआमआदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात अपघाती व नैसर्गिक मृत्यू झालेल्या १५५ भूमिहीन कुटुंबांना आतापर्यंत ४८ लाख ७५ हजार इतका लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने या कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आमआदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थीचा विमा उतरविण्यात येतो. संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरली जाते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१२ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये अर्थसहाय करण्यात येते.या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १५५ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे. यात संगमेश्वरमधील २ आणि लांजामधील एका भूमिहीन कर्त्या व्यक्तिचा समावेश आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ३५ भूमिहीन कुटुंबांना मिळाला आहे.तसेच लाभार्थीच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. या योजनेचाही लाभ येत्या मार्चपूर्वी ३० हजार विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होत आहेत.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास अशा कुटुंबाना ‘आमआदमी विमा योजना’ आधार ठरत आहे. लाभार्थींच्या मुलांना अनुसूचित जातीची किंवा आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती मिळत असेल किंवा तो मागासवर्गीय, आदिवासी वसतिगृहात मोफत निवास व जेवण घेत असेल तर त्याला ‘आम आदमी विमा योजना’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.या योजनेत लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये कुटुंबाला लाभ मिळतो.खेडेगावातील भूमिहीन शेतमजूर (५ एकर पेक्षा कमी जिरायती किंवा २.५ एकर म्हणजेच कमी बागायती जमीन धारण करणारी व्यक्ती) आमआदमी योजनेकरिता पात्र ठरू शकते. लाभार्थीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला ‘आम आदमी विमा योजना’, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आणि शेतकरी अपघात विमा योजना या तिन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो.
जिल्ह्यात ‘आमआदमी’ला मिळतोय विम्याचा भक्कम आधार
By admin | Updated: December 9, 2014 01:23 IST