रत्नागिरी : गणरायाच्या आगमनानंतर पाहुण्या येणाऱ्या माहेरवाशीण गौराईचे रविवारी दुपारी सर्वत्र आगमन झाले. गाैराईचे आगमनही अगदी साधेपणाने करण्यात आले. मात्र, महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. घरोघरी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. काही भाविकांकडे ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोन गौरींची, तर काही ठिकाणी एकाच गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
नदी, विहिरी, तसेच पाणवठ्यावरून गौरी वाजतगाजत आणल्या जातात. मात्र, काेराेनाच्या निर्बंधामुळे महिलांनी साधेपणाने गाैरी आणल्या. तांब्यात पाच/सात खडे, हळदीच्या पानात तीळ, तेरड्याची फुले मिळून प्रतीकात्मक गौरी तयार केली जाते. सुवासिनी, युवती प्रतीकात्मक गौरी घेऊन आल्यानंतर त्यांचे दारात पारंपरिक पद्धतीने औंक्षण करण्यात आले. भाकरी तुकडा ओवाळून घरात आणल्यानंतर गौरीला सजविण्यात आले. काठापदराची साडी, तसेच आभूषणांनी गाैरी सजवून गणपती शेजारीच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात येत असल्याने फुगड्याचा फेर मात्र फारसा रंगला नाही.
सर्वत्र साेमवारी गौरीपूजन करण्यात येणार आहे. यावर्षी पूर्वा नक्षत्रात गणपती आल्याने नवविवाहितांचे ओवसे भरले जाणार आहेत. त्यामुळे ओवशासाठी सुपे, फळे, फराळाचे पदार्थ खरेदी सुरू होती. गौरीपूजनासाठी फळभाज्या, फळे, फराळाच्या जिन्नसांनी सुपे सजवून गौरीसमोर वाण ठेवले जाते. गौरीसाठी फुले, शिवाय वाणासाठी पाच प्रकारच्या फळभाज्यांचे काप विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते. गौरीपूजनादिवशी काही ठिकाणी गोडाधोडाचा नैवेद्य दाखविण्यात येत असला तरी काही ठिकाणी मांसाहार केला जाताे. गौरीपूजनासाठी लागणारी फळे, शेवंतीची, झेंडूची फुले, वेण्या, हार, किरीट, कमरपट्टा, हळदीची पाने, केळीची पाने यांची खरेदी प्राधान्याने करण्यात येत होती.