रत्नागिरी : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिलपासून लांबलेली शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी सर्वत्र एकाचवेळी घेण्यात आली. कोरोनाची भीती असूनही जिल्ह्यातील १३९ परीक्षा केंद्रांवर ११ हजार ४३२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५१४ विद्यार्थी (९२ टक्के) विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते.
कोरोना संकटामुळे वारंवार शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. अखेर तज्ज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सर्वत्र गुरुवारी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील १३९ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ९० केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी ७ हजार १९५ विद्यार्थी हजर होते. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.