रत्नागिरी : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पाेलीस व आराेग्य विभागही सतर्क झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी आराेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणीसाठी ८०२ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी आजपर्यंत एसटी, रेल्वेसह खासगी गाड्यांनी लाखभर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने मुंबईतील विविध स्थानकांमधून गाड्यांची व्यवस्था केली होती. जिल्ह्यात आतापर्यंत १,२०० गाड्या दाखल झाल्या. त्यामधून सुमारे पन्नास हजारांहून अधिक चाकरमानी आले आहेत. कोकण रेल्वेच्या माध्यमातूनही हजारो प्रवासी आले आहेत. या सर्वांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे.
हे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून आपल्या गणेश भक्तांना व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर, बसस्थानके व रेल्वेस्टेशन येथे तसेच गाव पातळीवर ग्रामकृती दल कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची तपासणी आरोग्य पथकांमार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये महामार्ग, बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथे २५ आरोग्य पथके आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून ग्रामपातळीवर एकूण ७७७ पथके कार्यरत आहेत. गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर व ॲंटिजन अशा एकूण ५,००० पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
----------------------------
साथीचे आजार नाहीत
दैनंदिन कीटकजन्य, जलजन्य आजाराच्या व साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९ आजाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही साथ रोगाची लागण झालेली नाही. तरी कोविड-१९ आजार सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
----------------------
तालुका ठिकाणे आरोग्य पथके
मंडणगड १ २०
दापोली १ ४७
खेड ४ ११४
गुहागर १ ३०
चिपळूण ४ १३०
संगमेश्वर ६ ९१
रत्नागिरी ३ १८१
लांजा २ ६३
राजापूर ३ १०१
एकूण २५ ७७७