लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथे २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरामुळे शहराचे अपरिमित नुकसान झाले. महापुरामुळे आलेला चिखल, कचरा आणि त्यांनी निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे उद्भवणाऱ्या रोगराईपासून चिपळूणवासीयांची सुरक्षा व्हावी यादृष्टीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या मुंबई शाखेने सलग तीन दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे आयोजन जरी शहरातील चितळे मंगल कार्यालयात करण्यात आले होते. याशिवाय आरोग्य शिबिराच्या पथकातील डाॅक्टर, परिचारिका, ड्रेसर्स, फार्मासिस्ट यांनी शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, एस्.टी.स्टँड, खेर्डी, माळेवाडी, खतातेवाडी, वडार काॅलनी आदी ठिकाणच्या ७०० गरजू लोकांपर्यंत पोहोचून साथीच्या रोगांपासून बचाव होण्याच्या दृष्टीने शिबिरात तपासणी करून आवश्यक त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या डाॅक्टर, परिचारिकांनी केलेल्या कार्याची चिपळूण शहरवासीयांनी खूप प्रशंसा केली. क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या मुंबई शाखेचे प्रमुख डाॅ. लालजी यांच्या नेतृत्वाखालील डाॅक्टरांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. यावेळी रत्नागिरी सेक्टर संयोजक रमाकांत खांबे, मधुकर पंडित, लक्ष्मण बोबले, चंद्रशेखर बेंडखळे उपस्थित होते.