राजापूर : महाआवास अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील ६७२ घरे मंजूर झाली असून, त्यातील ६०० घरांचे काम पूर्ण झाले आहे व ७२ घरकुले प्रगतीपथावर आहेत.
महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक समारंभ सोहळा आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर ते ५ जून २०२१ या काळात ‘महाआवास अभियान’ ग्रामीण भागात राबवले गेले. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले महाराष्ट्रामध्ये व त्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २,१४२ घरकुले व त्यातील राजापूर तालुक्यामध्ये ६७२ घरकुले मंजूर झाली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळवडे, सोलगाव, वाडापेठ या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार’ मनिषा लक्ष्मण बंडबे, सावित्री घाडी, भागिर्थी पांचाळ यांना देण्यात आला. आवास योजनेंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट क्लस्टर रमाई आवास योजना पुरस्कार’ केळवली ग्रामपंचायत, ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार’ विल्ये, रायपाटण, तेरवण या ग्रामपंचायतींना देण्यात आला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना ‘सर्वोत्कृष्ट घरकुल रमाई आवास योजना पुरस्कार’ राजेंद्र जाधव - येरडव, विद्याधर पाटणकर - रायपाटण व ताई तांबे - ससाळे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समिती सभापती करुणा कदम, गटविकास अधिकारी सागर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी तेजश्री आवळे, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, अभिजीत तेली, प्रमिला कानडे, प्रकाश गुरव, विशाखा लाड, प्रशांत गावकर, अमिता सुतार, सरपंच, ग्रामसेवक व अन्य अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.