गुहागर : गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागात पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्बल ६५ पदे रिक्त आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभमीवर ही बाब अतिशय धक्कादायक आहे. १३७ मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात आरोग्य विभागाचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु आहे. मात्र, तालुक्यात तळवली, आबलोली, कोळवली, चिखली व हेदवी ही चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता डॉक्टर व कर्मचारीसंख्या अपुरी पडत आहे. चिखली दवाखाना मुख्य रस्त्यावर आहे. येथे अपघाताच्या रुग्णांसह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे केवळ एक वैद्यकीय अधिकारी आहे. आबलोली, कोळवली येथील मंजूर दोनपैकी प्रत्येकी एक डॉक्टर गैरहजर आहेत. तळवली येथील दोन डॉक्टरपैकी एक पुढील शिक्षणासाठी रजेवर आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी दिवस-रात्र एकाच डॉक्टरवर भार पडत आहे. केवळ हेदवीमध्ये २ पदे असून, तेथील एक डॉक्टर दुसऱ्या दवाखान्यात अधिभार सांभाळत आहेत. त्यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा भारदेखील आहे. तालुक्यात अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सहायकाच्या ५ मंजूर पदांपैकी ३ पदे, आरोग्य सहायक (पुरुष) १० मंजूर पदांपैकी ३ रिक्त, कुष्ठरोग तंत्रज्ञ ३ पैकी ३ रिक्त, मिश्रक ५ पैकी ४ रिक्त, कनिष्ठ सहायक ५ पैकी १ रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५ पैकी ३ रिक्त, आरोग्यसेविका ३५ पैकी १४ रिक्त, आरोग्यसेवक ३० पैकी १५ रिक्त, परिचर २० पैकी ९ रिक्त, स्विपर ५ पैकी ४ रिक्त, याप्रमाणे तब्बल ६५ पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. गुहागर तालुक्यात पावसाळ््यापूर्वी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
आरोग्य विभागात ६५ पदे रिक्त
By admin | Updated: June 23, 2014 01:38 IST