चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल कंपनीत झालेल्या भीषण आगीतील मृत्युमुखी पडलेल्या चौघांना कंपनी व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५५ लाख, तर जखमींना २० लाखांची मदतीशिवाय उपचारही केले जाणार आहेत. तसेच मृतांच्या नातेवाइकांना कंपनीत नोकरी हवी असल्यास त्यांना सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.
घरडा कंपनीतील आगीची घटना घडताच मंत्री सामंत यांनी नियाेजित दाैरे रद्द करून तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी कंपनी व्यवस्थापन व अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माहिती देताना सामंत यांनी सांगितले की, घरडा कंपनीत घडलेली घटना दुर्दैवी असून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर मुंबईत तत्काळ उपचार सुरू आहेत. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना ५५ लाखाची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना २० लाख व उपचारासाठी लागणारा सर्व खर्च केला जाणार आहे. कंपनीत सुरक्षेसाठी ज्या-ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे तिथे कॅमेरे लावण्याच्या सूचना करण्यात आले असल्याची माहिती मंत्री सामंत सांगितले. औद्योगिक वसाहतीत सुरक्षा यंत्रणेबाबत ठोस उपाययोजना केल्या जाणार असून, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल. कोल्हापूर येथील औद्योगिक सुरक्षा कार्यालय हे लवकरच लोटे येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केेले जातील. लोेटे औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ११० कंपन्यांचे व्हीजेआयटीकडून केमिकल व फॅब्रिकेशन संबंधीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.
या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती घेतली आहे. त्यांच्यामार्फत लोटे औद्योगिक क्षेत्रात लवकरच ठोस उपाययोजना केल्या जाणार आहे. लोटे केमिकल झोन असल्याने त्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन बळकटीकरणाबरोबरच विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
चाैकट
खातेनिहाय चाैकशी करणार
या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजित चव्हाण हे घटनास्थळी वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळुणातील कार्यालय लोटे येथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
फाेटाे ओळ २००३२०२१-आरटीएन-०२
खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीत स्फाेट झाल्याची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते.