चिपळूण : कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानुसार ५० सिलेंडरचा ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरू होणार असल्याचे कामथेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांनी सांगितले.
कामथे उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यानुसार येथे ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होत असताना त्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे भविष्यात ऑक्सिजनचा साठा असणे आवश्यक आहे. यासाठी दोन ते तीन दिवसांत येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी सुरू होईल. त्यानंतर लवकरच काम पूर्ण होऊन हा ऑक्सिजन प्लांट सुरू होईल असे डॉ. सानप यांनी सांगितले.
कामथे येथे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण सेंटर होते. परंतु येथे कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्याने येथील लसीकरण थांबविण्यात आले असून येथे पहिला डोस घेतलेल्यांना आता नगरपरिषदेच्या नागरी आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होणार आहे, असेही डॉ. सानप यांनी सांगितले.