खेड : डिझेल भरण्याच्या बहाण्याने पेट्राेलपंप मालकाची ४० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील बोरज येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी पाेलिसांनी अज्ञात व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पेट्राेल पंप मालक जागृती दळवी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर फोन करून माझ्या दोन गाड्या डिझेल भरण्यासाठी येत आहेत. त्यांना डिझेल द्या. मी तुम्हाला ॲडव्हान्स रक्कम पाठवतो असे सांगून फोन पे वरून हाय मेसेज करून दोन रुपये पाठवले. त्यानंतर जागृती दळवी यांच्या मोबाईलवर फोन करून मी तुमच्या खात्यात ३० हजार रुपये पाठविले असे सांगितले. थोड्या वेळाने दळवी यांना फोन करून माझ्या गाड्या उशीरा येणार आहेत. त्यामुळे मी तुमच्याकडे जमा केलेले ३० हजार रुपये परत पाठवा, असे सांगितले. त्यामुळे दळवी यांनी फोन पे वरून ३० हजार रुपये पाठवले.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने परत फोन करून सांगितले की, माझ्याकडून तुमच्या खात्यात १० हजार रुपये चुकून ट्रान्स्फर झाले आहेत ते मला परत पाठवा असे सांगून त्यांना मोबाईलवर गुंतवून ठेवले. दळवी यांनी सुद्धा कोणतीही खात्री न करता आणखी १० हजार रुपये फोनपेद्वारे परत केले. दरम्यान दळवी यांनी आपले बँक खाते तपासले असता त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम जमा झालेली दिसली नाही. उलट दळवी यांच्या खात्यातील ४० हजार रुपये त्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे आढळले. त्यामुळे या सर्व प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.