श्रीकर भोसले ल्ल गुहागरगुहागर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची वाताहत लागली होती. त्यांची वेळीच दुरुस्ती न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आता पावसाच्या तोंडावर बांधकाम खात्याला जाग आल्याने थातूरमातूर कामे केली जात आहेत. मात्र, जोपर्यंत जिल्हा परिषदेकडून या ३७ रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निधीची उपलब्धता होत नाही, तोवर प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येते.शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत राज्य मार्ग परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गांवरून होणारी एस. टी.ची वाहतूक बंद ठेवावी लागणार असल्याचा इशारा दिला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यातील रस्ते ताबडतोब सुस्थितीत करण्यात येतील, असा निर्वाळा दिला. जिल्हा परिषद बांधकाम खात्याने मात्र मागील वर्षीच्या अतिवृष्टीत खड्ड्यात गेलेले तालुक्यातील ३७ रस्ते अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे मान्य केले. पावसाच्या तोंडावर हे खड्डे खडीने भरण्यासाठी ४४ लाख २५ हजार रुपये अंदाजीत खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. ३७ रस्त्यांपैकी ४ रस्ते जिल्हा मार्ग, तर उर्वरित ३३ रस्ते ग्रामीण मार्ग श्रेणीतील आहेत. या रस्त्यांवर एकूण सुमारे ३४ हजार चौरस मीटर खड्डे भरण्याचा प्रस्ताव आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग निधीच्या प्रतीक्षेत असून, एस. टी. महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात १२ मार्गावर एस. टी. चालविणे धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. यापैकी २ फेऱ्या बंद करण्याचा निर्णयही महामंडळाने जाहीर केला आहे. खड्डेमय बनलेल्या रस्त्यांमुळे एस. टी. महामंडळाचे नुकसान होत असून, नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एस. टी.बरोबरच खासगी वाहनांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.
३७ रस्ते खड्ड्यात
By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST