चिपळूण : रखरखत्या उन्हात शहराच्या मुख्य बाजारपेठेतील सर्वांत जुन्या ‘वैभव ड्रेसेस’ या कापड दुकानाला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल तीन तास शेकडो नागरिक आणि पाच अग्निशामक बंब धडपडत होते. या आगीमध्ये सुमारे वीस लाखांचे नुकसान झाल्याचा आणि शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दुपारी बारा वाजता ही घटना घडली. दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. तातडीने नगर परिषदेला आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. चिपळूण नगरपरिषदेचा पहिला अग्निशमन बंब ही आग विझविण्यासाठी तत्काळ धावला; परंतु वाहते वारे व रखरखते ऊन, कपड्यांचे दुकान आणि अवतीभोवती अन्य दुकानांची गर्दी यामुळे ही आग आणखीनच भडकली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. त्यामुळेच या आगीला आवर घालण्यासाठी खेड, लोटे औद्योगिक वसाहत, पोफळीतील महाजनको अशा पाच अग्निशमन दलांच्या बंबांनी व कर्मचार्यांनी जिवावर उदार होऊन दहापेक्षा अधिक फेर्या मारून साखळी पद्धतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अन्य विभागातून गाड्या येईपर्यंत चिपळूणच्या कर्मचार्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आगीशी झुंज सुरू ठेवली होती. या घटनेची तक्रार कापड दुकान मालक संजय सुभाष सुराणा यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. कापड दुकान व शेजारीच फटाक्यांचे दुकान असल्याने या दुकानात आग लागलेली असताना यावेळी फटाक्यांचा आवाजही मोठ्या प्रमाणात येत होता. शेजारी असलेल्या समर्थ स्टेशनरी, गायत्री ट्रेडर्स, बालाजी ट्रेडर्स, प्रभाकर गुढेकर यांच्या किराणा दुकानातील माल नागरिकांनी व अन्य गाड्यांतून हलविण्यात आला. आग विझविल्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी सारा जळालेला कचरा हलवून त्याची विल्हेवाट लावली. दुपारनंतर पालकमंत्री उदय सामंत, खासदार हुसेन दलवाई यांनी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
आगीत २० लाखांचे नुकसान चिपळूणमधील घटना : कापड दुकान भस्मसात; शॉर्टसर्किटचे कारण
By admin | Updated: May 10, 2014 00:04 IST