देवरुख : देवरूख शहरातील विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल २ कोटी ५ लाख १८ हजार ५९० रुपयांचा निधी देवरूख नगरपंचायतीला मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे रस्ते विकासाला आता बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.निधीतील पहिला हप्ता १ कोटी २ लाख ५९ हजार १२० रुपये मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवरुख शहराच्या विविध टप्प्यातील विकासकामांकरिता मंजुरी, निधी याविषयी देवरुख नगरपंचायतीच्यावतीने एक शिष्टमंडळ नेमून नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार बाळ माने, विनय नातू, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर या शिष्टमंडळाच्या मार्गदर्शनाखाली भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले, कुंदन कुलकर्णी, हनिफ हरचिरकर आदींच्या शिष्टमंडळाने नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानुसार राज्यातील नगरपालिका, परिषदा, नगरपंचायत यांना मिळणाऱ्या रस्ता अनुदानाचा निधी १७ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात आला. गतवर्षी देवरूख नगरपंचायतीत केवळ २ लाख ५७ हजार रुपये इतकाच मिळाला होता, तर यावर्षी शिष्टमंडळाने घेतलेल्या प्रयत्नांमुळे २ कोटी ५ लाख १८ हजार ५२० इतका मिळाल्याचे भुरवणे यांनी सांगितले. त्यातील १ कोटी २ लाख ५९ हजार १२० रुपयांचा पहिला टप्पा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरांतर्गत बहुतांश रस्त्यांना बळकटी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीमधून जास्तीत जास्त नवीन रस्त्यांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.याखेरीज देवरुख शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी देवरुख शहराची पाणी पुरवठा योजना विस्तारीत करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाकरिता राहिलेल्या त्रुटींची पूर्तता करुन तांत्रिक मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती देण्यासाठी राज्यमंत्री विशेषत्त्वाने सहकार्य करणार असल्याचे भुरवणे यांनी स्पष्ट केले.देवरुखच्या स्वच्छता मोहिमेला अधिक बळकटी यावी, याकरिता ४ छोटे टेम्पो कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांसाठी प्रस्ताव केला असल्याचे सांगितले. यावर्षी नगरोत्थान फंडातून देवरूख शहराच्या पथदीप विकासासाठी १८ लाख २० एलईडी दिवे मंजूर झाले असून, निविदा प्रक्रियेनंतर देवरुखमधील मुख्य चौकात, मार्गावर हे दिवे बसवण्यात येणार असल्याची माहिती भुरवणे यांनी दिली.यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सदानंद भागवत, भाजप शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी, राष्ट्रवादीचे हनिफ हरचिरकर, नगरसेविका मिताली तळेकर, नगरसेविका निकिता रहाटे, वैभवी पर्शराम, मेघा बेर्डे, मुख्याधिकारी शिल्पा नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १ कोटीनगरपंचायत प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेऊन देवरुख नगरपंचायतीच्या नूतन इमारतीच्या बांधकामाला राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून तब्बल १ कोटी रुपयांचे अनुदान मिळवण्यात यश आल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे आता देवरुख नगरपंचायतीच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
देवरुखातील रस्ते विकासासाठी २ कोटींचा निधी
By admin | Updated: November 21, 2015 00:20 IST