सुमय्या तांबे ल्ल खाडीपट्टाखेड तालुक्यातील १८ गावांमध्ये आपत्ती काळात नदीकाठच्या गावात रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. ११ साथग्रस्त गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती, साथरोग नियंत्रण कार्यक्रम तयार करण्यात आला असून, वैद्यकीय पथक २४ तास कार्यरत राहणार आहे.अतिरिक्त औषधांचा साठाही उपलब्ध असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुसळधार पर्जन्यवृष्टीचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसत असतो. यामुळे रोगराई पसरण्याचा जास्त धोका असल्याने आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरग्रस्त भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर परिस्थिती दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणाहून आपत्ती परिस्थिती गावात अर्ध्या तासात मदत मिळेल, अशा पध्दतीने नियोजन करण्याचीे संबंधित विभागाच्या पथकाला सूचना देण्यात आली आहे.धोका टळण्यासाठी आरोग्य विभागाकडून मेडिक्लोरसारख्या पाणी शुद्धीकरणाच्या औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणारी साथग्रस्त, जोखीमग्रस्त, टँकरग्रस्त व दुर्गम व कठीण असे विभाग करण्यात आले आहेत. यातील जोखीमग्रस्त गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. खेड तालुक्यातील जोखीमग्रस्त गावांसाठी वेगळी प्रणाली निर्माण केली गेल्यामुळे व्यवस्थापनाचे काम सोपे होईल.
खेडमधील १८ गावे जोखीमग्रस्त
By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST