लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ठाणे येथील सहायक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यामुळे राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे काळजी घेत शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शहरात ७१४ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली असून, त्यामध्ये १५ टक्के परप्रांतीय असल्याची नाेंद करण्यात आली आहे.
फेरीवाल्याच्या हल्यामुळे ठाणे येथील सहायक पालिका आयुक्तांची दोन बोटे तुटल्याने, महापालिका, नगरपालिका प्रशासनात काम करणारे सर्वच कर्मचारी भयग्रस्त झाले आहेत. कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा समोर आला आहे.
परप्रांतीय फेरीवाल्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे कारवाई होते आणि त्याचा फटका स्थानिक फेरीवाल्यांनाही बसतो. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. बुधवारपासून शहरातील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे.
नगरपरिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील फेरीवाल्यांची संख्या ७१४ असून, त्यामध्ये १५ टक्के परप्रांतीय आहेत.
प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्व-निधी योजनेंतर्गत ज्या फेरीवाल्यांनी १० हजारांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यांना या लॉकडाऊनमध्ये शासनाने १,५०० रुपये दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये थांबलेले सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरू होऊन आता सभागृहाची मान्यता घेऊनच, या फेरीवाल्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.