लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दुसऱ्या लाटेतील कोरोना दुप्पट क्षमतेने वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात १० वर्षांखालील १४८ बालके, तर त्यापुढील ३० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील १२४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या २० दिवसांत १ ते ३० वर्षे वयोगटातील १३९४ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याची खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे.
दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढ होत असून, त्यामध्ये बालके आणि युवकही कोरोनाच्या विळख्यातून सुटलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाबत पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाकडून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवून अधिक काळजी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. बालके, तरुण, युवकांसाठी कोरोना महामारी किती धोकादायक आहे, हे ओळखूनच शाळाबंदचा मोठा निर्णय घेतला होता. तरीही बालके, युवक आणि तरुणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरात दिवसाला ५०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित एकूण १८,०४६ रुग्णसंख्या झाली असून, ५०३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. १२,७४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एप्रिल महिन्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असले तरी त्यामध्ये पन्नाशीनंतरचे जास्त रुग्ण असून, त्यामध्ये ३० वर्षाखालील दोनच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
...................................
बालके, युवकांची प्रतिकारशक्ती जास्त
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत असले तरी बालके, युवक तसेच तरुण कोरोनाबाधित होत असले तरी त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने ते कोरोनाबाधित असतानाही बचावत आहेत. तर वाढत्या वयातील लोकांना वेगवेगळे आजार असतात तसेच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.