रत्नागिरी : जिल्ह्यात दाेन दिवसांत ११५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,८४८ झाली आहे. १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ९,९६८ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ७५ रुग्ण तर अँटिजेन तपासणीतील ४० रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ४४३ रुग्ण, संगमेश्वरमध्ये ७ रुग्ण, मंडणगडात ५, गुहागरमध्ये ६, चिपळूणात ३४ रुग्ण, खेडमध्ये ३, दापोलीत ५ रुग्ण, लांजात ५ रुग्ण आणि राजापूरमध्ये ६ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात वर्षभरातील कोरोनाच्या मृतांची संख्या ४७२ असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३.४५ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४७ टक्के आहे. गृह विलगीकरणात १८१ रुग्ण असून वेगवेगळ्या रुग्णालयांत ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत.
चौकट-
रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात मागील दोन दिवसांत ४४ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ९५ रुग्णांचा मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील सर्वात जास्त मृत्युसंख्या आहे.